नाशिक : वृत्तसंस्था
जिल्ह्यात असलेले वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना एसटी बस थेट 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये २३ प्रवासी होते. पैकी एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची ही बस आहे. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व जखमी प्रवाशांना वणी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य पूर्ण करून जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष वणी रुग्णालयात आढावा घेत आहे. नेमका अपघात कशामुळे झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही.