जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कंडारी येथून बेपत्ता असलेल्या व रायपूर येथे पाटचारीत मृतदेह आढळून आलेल्या राहुल उर्फ गोलू युवराज भिल या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील भूषण उर्फ भुरा पाटील (रा. वसीम, ता. भुसावळ) या होमागार्डला अटक करण्यात आली असून, दुसरा संशयित जयराम धोंडू कोळी याला यापूर्वीच दुसऱ्या एका गुन्ह्यात नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
जळगाव तालुक्यातील कंडारी येथील राहुल भिल येथून २ जुलैपासून बेपत्ता होता. ६ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता राहुलचा मृतदेह रायपूर शिवारातील पाटचारीजवळ संशयास्पदरीत्या आढळून आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व १० जुलै रोजी भूषण उर्फ भुरा पाटील याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने खुनाची कबुली दिली. दुसरा संशयित जयराम कोळी यापूर्वीच दुसऱ्या एका गुन्ह्यात अटकेत आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, किशोर सय्यद, सुधाकर गिरासे, से, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, काझी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, पोलिस चालक इम्तियाज खान, मनोज पाटील, जगदीश भोई यांनी केली. पुढील तपास नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळ हे करीत आहेत.