एरंडोल : प्रतिनिधी
जळगाव एरंडोल महामार्गावर दुपारच्या सुमारास इगतपुरी बसच्या अपघाताची घटना होत नाही तोच रात्री ८ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून एरंडोलकडे येणारी बस व पुढे चालणारी रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षामधील चार प्रवासी जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोलपासून पारोळ्याकडे तीन किलोमीटर अंतरावर हॉटेल फाउंटनपासून थोड्या अंतरावर मंगळवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास घडला.
यात एकाच परिवारातील तीन वर्षांच्या बालकासह आई-वडील जखमी झाले. जखमींपैकी एकाचा रुग्णालयाच्या वाटेतच मृत्यू झाला. फारुख रमजान खाटीक (२६, फकीरवाडा, एरंडोल), मुस्कान फारुख खाटीक (२२), फयीजाआन फारुख खाटीक (३), गणेश शांताराम महाजन (४५, पारोळा) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी फारूख खाटीक याला रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. धुळे-जळगाव बस (एमएच २० बीएल ३४५१) एरंडोलकडे येत होती तर त्यापुढे रिक्षा (एमएच १९ एएक्स ०२९१) होती. या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातामुळे थोडा वेळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, अखिल मुजावर, किरण पाटील हे अपघातस्थळी हजर झाले. अपघातातील गाडी बाजूला करण्यात आली व वाहतूक सुरळीत झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील, शैलेश चौधरी यांनीसुद्धा मदतकार्य केले.