धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील ५१ वर्षांच्या व्यक्तीला पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने आठ महिन्यांपूर्वी चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यांना रेबीजची लक्षणे जाणवल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ८ जुलै रोजी दुपारी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ईश्वर दगडू बडगुजर (वय ५१, रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शनिवारी ८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील करीत आहेत.
काय घडली घटना
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ईश्वर दगडू बडगुजर यांना आठ महिन्यांपूर्वी पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी कुत्र्याच्या चावाकडे दुर्लक्ष केले; मात्र २६ जून रोजी त्यांना अचानक ताप आला. त्यामुळे त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने मुंबईतील सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.