एरंडोल : प्रतिनिधी
शहरातील शेतकी संघाच्या कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन संशयित आरोपींना रविवार, ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोघांकडून चोरीचे ९ मोबाईल हस्तगत केले आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, एरंडोल शहरातील शेतकी संघाच्या कॉम्प्लेक्समध्ये हरिओम इंटरप्रायजेस नावाचे मोबाइल दुकान आहे. हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोइन त्यातून मोबाइल लांबविले होते. एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले होते.
त्यानुसार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, संदीप सावळे, महेश महाजन, पोलिस नाईक नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, महिला पोलिस नाईक उपाली खरे, भरत पाटील, प्रमोद ठाकूर यांचे पथक रविवार, ९ जुलै रोजी दुपारी टिकाराम कोमल मोरे (२८) रा. एरंडोल आणि पंकज मंगल वाघ (३०) रा. हिंगोना, ता.धरणगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे एकूण ९ मोबाइल हस्तगत केले आहे. यातील एक संशयित आरोपी प्रवीण बागुल हा पोलिसांना पाहून पसार झाला आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही अटकेतील संशयितांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहेत.