मुंबई : वृत्तसंस्था
अजित पवारांनी राष्ट्रवादीतील फुटी नंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद जोरात सुरु असून अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेक राजकीय नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली. शरद पवारांवर त्यांनी जहरी टीका करत त्यांचा उल्लेख ‘सैतान’ असा केला.
माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “महाराष्ट्रातील राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे चालल्याचं बघायला मिळतयं. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माणसांच मोठं योगदान आहे.” यापुढे शरद पवारांविषयी बोलताना खोत म्हणाले की,” ८०च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ ५० वर्ष या राज्यामध्ये राहिला.” खोत म्हणाले की,” देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला याचं मोठं श्रेय द्यावं लागेल. शरद पवारांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर काळानं मोठा सुड उगवला. त्यामुळे शरद पवारांना त्यांना गावगाड्याकडे धावतं यावं लागत आहेत. जैसी करणी वैसी भरणी कलयुगामध्ये ज्याचं पाप त्यालाचं फेडाव लागतं आणि शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थांन फेडावं लागत आहे. हे आम्हा कार्यंकर्त्यांचं काम आहे की गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये.” सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘सैतान’ असा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे