नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘आदीपुरुष’ चित्रपटातील छपरी संवादामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अखेर या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बिनशर्त माफी मागितली आहे.
मनोज यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आदिपुरुषामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे मी मान्य करतो. हात जोडून मी तुम्हा सर्व बंधू-भगिनी, वडीलधारी मंडळी, आदरणीय ऋषी-संत आणि श्रीरामाच्या भक्तांची मनापासून माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. एक आणि अखंड बनून पवित्र सनातन धर्म आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य द्या.
सुमार व्हिएफएक्स, कलाकारांचे पोशाख, छपरी संवाद अशा विविध कारणांमुळे ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तब्बल 600 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली. हिंदुस्थानात या चित्रपटाने 286 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. परंतु, सोशल मीडियावर लोकांचा त्यांच्याबद्दलचा राग शांत होताना दिसत नाही. मनोजने हे काम आधी करायला हवे होते. चित्रपट थिएटरमधून उतरला, तेव्हा तुम्ही माफी मागत आहात प्रेक्षकांना मूर्ख समजता का ? अशा संतप्त सवाल प्रेक्षकांनी विचारला आहे.