धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या काही वर्षापासून वाळू माफियांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता पण गेल्या काही दिवसापासून धरणगाव तहसील कार्यालयाला तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुका परिसरात वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई सुरु केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. वाळू चोरीचे रस्ते बंद केल्यानंतर आता चक्क नांदेड गावाजवळ ठिकठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले तब्बल शंभर ब्रास वाळूसाठे जप्त केले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे धरणगाव तहसील कार्यालयातील महसूल विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा पारदर्शक होवू लागली आहे.
नांदेड गावातील वाळू चोरट्यांचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून तहसीलदार सूर्यवंशी यांनी बंद केला. यामुळे चोरट्या वाळू वाहतुकीला लगाम बसला होता. पावसाळ्यात जादा दराने वाळू विकता यावी, यासाठी परिसरात काही वाळूमाफियांनी वाळूचे साठे तयार करून ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यवंशी यांनी वाळूसाठ्यांना जप्त करण्याचे आदेश दिलेत. बुधवारी तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संदीप मोरे, नांदेडचे प्रभारी तलाठी भागवत पवार, बाभूळगावचे तलाठी शेख, पोलिस पाटील शशिकला सैंदाणे यांनी पंचनामे केले.
पंचनामे करण्यात आलेली वाळू उचलून धरणगावला शासकीय जागेतनेण्यात येणार होती. परंतू पावसामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे तहसीलदार सूर्यवंशी यांनी दिवसरात्र या साठ्यांवर गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. जप्त वाळूसाठ्यांची जबाबदारी पोलिस पाटील व कोतवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.