मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा ठाकरे गटाचा मोठा नेता प्रवेश करीत असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मिळणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी फुट पडल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटात पसरलेली नाराजी दूर होण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करुन धक्का दिला होता. आज त्यापेक्षा मोठा धक्का ठाकरेंना बसणार आहे. विधान परिषदेतला बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. हा पक्षप्रवेश आज दुपारी होणार असल्याची माहिती आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या या नेत्यांसोबत आणखी दोन मोठे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. सध्या त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत असून आज दुपारी ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येतंय.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले ४० आमदार त्यांच्यासोबत आले होते. त्यानंतर सुरु झालेली पक्षप्रवेशाची मोहीम थांबायचं नाव घेत नाही. प्रत्येक विभाग, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरील पदाधिकारी शिंदेंवर विश्वास दाखवत आहेत. आजचा संभाव्य पक्षप्रवेश झालाच तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल. कारण मागील कित्येक वर्षांपासून ते पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत आहेत. एक निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ते कधी शिंदेंकडे येतील, असं वाटत नव्हतं. परंतु आज प्रवेश निश्चित असल्याचं मानलं जात आहे.