नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकारणावर अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर आता मोदी सरकारमधील केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील परखड प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन गडकरी म्हणाले कि, महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील. पण मनभेद नव्हते. मी 18 वर्षे विधिमंडळात होतो. कठोर टीका करायचो. पण सर्वांशी वैयक्तिक मैत्री होती. पण आता थोडेसे जास्त झाल्यासारखे वाटते, असे ते म्हणालेत. ते एका मराठी उपग्रह वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले पडली आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांनी या घटनाक्रमावर सडेतोड मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असतील, पण मनभेद नव्हते. मी तब्बल 18 वर्षे विधिमंडळात होतो. मी कठोर टीका करायचो. पण सर्वांशी माझी वैयक्तिक मैत्री होती. पण आता थोडेसे जास्त झाल्यासारखे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला याचा कंटाळा आलाय. खरे तर याला नेत्यांपेक्षा मीडियाच जास्त कारणीभूत आहे. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, देशात विचारभिन्नता ही समस्या नाही तर विचारशून्यता समस्या आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाच्या विचाराचे असला तरी, तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. मूळात याला मतदार जबाबदार आहेत. जसे आपण मुलीसाठी नवरदेव पाहतो, सासू-सासरे कसे आहेत? घर कसे आहे? याचा विचार करतो. मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाही. हा माझ्या जातीचा, हा माझ्या भाषेचा म्हणून मतदान केले जाते. जनतेने ज्या दिवशी विचारपूर्वक मतदान करण्याचे ठरवले, त्यादिवशी राजकारणात आपोआपच बदल होतील, असे गडकरी म्हणाले.