मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात शिंदेंच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात मोठा भूकंप झाला असून शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असे अजित पवार म्हणाले आहेत. तर शरद पवारांनी मात्र या निर्णयाला माझं समर्थन नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट फडल्यानंतर शरद पवारांनी लगेचच पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. तर अजित पवार यांनी त्यांच्या गटाला सरकारमध्ये कोणते मंत्रिपदे मिळतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
यादरम्यान राष्ट्रवादी पक्षात कोणाचा शब्द चालणार आणि कोणाच्या पाठीशी किती किती संख्याबळ आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार आणि आजित पवार या दोन गटांमध्ये कोणते आमदार-खासदार जाणार याकडे देखील महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता ५ जुलै रोजी हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
शरद पवार यांनी यांनी बुधवार, ५ जुलै रोजी, दुपारी १ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पक्षातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाकडून देखील ५ जुलै रोजीच सर्व समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ५ तारखेला मेळावा घेण्याच्या तयारीत अजित पवार गट असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता राज्यातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.