मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, अजित पवार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.
हे सरकार आहे, त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार. अनेक दिवस चर्चा सुरू होती. देशपातळीवरील राजकीय परिस्थिती, राज्याची परिस्थिती बघता विकासाला महत्व दिलं पाहिजे असं माझं आणि सहकाऱ्यांचं स्पष्ट मत आलं. अतिशय मजबुतीने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न मोदीसाहेब करत आहे. त्यामुळे आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला वाटलं. शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाला भूमिका मांडली होती. इथून पुढे तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रांतात नवे कार्यकर्ते पुढे आणले पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो. बहुतांश नेत्यांना माझा निर्णय मान्य. पक्षाचे चिन्ह व नाव आमच्याकडेच, आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू. पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सकारात्मकतेने काम करणे गरजेचे आहे. आज अतिशय मजबुतीने देशाचं नेतृत्व मोदींच्या हातात आहे, हे नाकारता येणार नाही. विकासाच्या प्रश्नावर ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे. जर मोदीच 2024 मध्ये पंतप्रधान होणार असतील तर आपण त्यांच्यासोबत गेले पाहिजे. आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला. अनेक जण आरोप करतात केसेसमुळे गेले. शपथ घेतलेल्यांपैकी अनेकांवर केसेस नाही. उगीच कुणीतरी आमच्यावर आरोप करू नये. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही सरकारसोबत राहुन जनतेचे प्रश्न सोडवू.