बीड : वृत्तसंस्था
राज्याला हादरवून टाकणारी मोठी घटना पुन्हा एकदा घडली आहे. जालन्यात कारचा भीषण अपघातानंतर आग लागून यात महिलेचा मृत्यू झाला. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा अपघात झाला. मंठा लोणार रस्त्यावर गाडी उभा असताना पीक अपने मागून धडक दिली. यानंतर कारला आग लागली आणि यात महिला होरपळून ठार झाली. यावेळी पती कारच्या बाहेर असल्याने ते अपघातातून बचावले.
कारमध्ये जळून पतीसमोर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ५ घडली होती. पतीने दिलेली माहिती व घटना पहिल्यापासूनच संशयास्पद होती. दरम्यान, मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता सोळंके (३०) असे मृत विवाहितेचे तर अमोल सोळंके (काऱ्हाळा, ता. परतूर) असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान आरोपीस अटक करण्यात आली. तेरा वर्षापासून मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तसेच वेळोवेळी घटस्फोट दे, असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देत होता. अनेकदा अमोल सोळंके याने पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी केली. परंतु पत्नी घटस्फोट देण्यास नकार देत असल्यामुळे राग मनात धरून पत्नीला कारमध्ये जिवंत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ बळीराम जाधव (स्वामी विवेकानंद नगर, माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे पती-पत्नी रात्री बारा वाजेच्या सुमारासच शेगाव येथून का निघाले, टेम्पो ने कारला धडक दिली, तर कार डॅमेज का झाली नाही, कार जळत असताना पतीने काचा फोडून पत्नीला का वाचविले नाही, असे अनेक प्रश्न या घटनेतून उपस्थित होत होते. पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपीस पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी आरोपीस परतूर तालुक्यातून ताब्यात घेतले.