अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील चौबारी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २५ जून रोजी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे.
फिर्यादी रामभाऊ भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ जून रोजी ते व त्यांची पत्नी सुनंदा हे समाजातील मुलीचा बस्ता असल्याने गावातील रिक्षातून अमळनेर येथे गेले होते. तेथून परत येताना दोघांनी मागून दुचाकीने येत वाद घातला. संध्याकाळी यातील एक जण आला आणि त्याने शिवीगाळ करत दगड उचलून मारला. या झटापटीत भावजय व मुलगा यांनादेखील मुका मार लागला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वैजयंता शंकर भिल यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा पांडुरंग याला काही जण चापटबुक्क्यांनी मारहाण करून दगड फेकून मारत असल्याचे त्यांना दिसले. त्याठिकाणी पांडुरंग याची पत्नी सुशीला व मुलगी अश्विनी वडर या भांडण सोडवायला गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यात पांडुरंग व वैजयंताबाईस मुका मार लागला आहे. अश्विनी हिला हत्याराने पोटाला मारल्याने तिला उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले होते.