जळगाव : प्रतिनिधी
येथील शिवशक्ती कॉलनीत दुकान बंद करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीची सोनपोत हिसकावून दोघे दुचाकीस्वार पसार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यासंदर्भात तालुका पोलिसात शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी रोड परिसरातील शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी रंजना पंढरीनाथ पाटील (वय ५६) या महिलेचे याच परिसरात किराणा दुकान आहे. गुरुवारी रात्री ९ वाजता ते दुकान बंद करण्यासाठी शटर ओढत होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनपोत हिसकावली आणि दुचाकीवरून दोघेही पसार झाले. घटनास्थळी डीवायएसपी संदीप गावीत यांनी भेट दिली. दरम्यान, शुक्रवारी रात्री अज्ञात दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि. ३९२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार नयन पाटील करीत आहेत.