जळगाव : प्रतिनिधी
समतानगरात असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले आणि एक जण ताब्यात घेतल्याची माहिती देत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी माघारी परतले.
१९८२ मध्ये स्थापन केलेल्या या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजता समोर आला. त्यानंतर या भागातील शेकडो समाजबांधव एकवटले. ही घटना कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत, रामानंद पोलिस स्टेशनच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी धडकला. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. मात्र जमावाने आरोपीला अटक करून त्याच्यातर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यासाठी आग्रह धरला. त्यासाठी जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. काव्यरत्नावली चौकात हा मोर्चा आल्यावर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार मोर्चेकऱ्यांना सामोरे गेले. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी संशयिताला अटक करीत त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांचा याठिकाणी मोठा बंदोबस्त होता.
एकाविरोधात गुन्हा दाखल
आकाश दादाराव अडकमोल (वय ३०) यांनी रामानंद नगर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गोकूळ हंसराज राठोड हा पुतळा विटंबना करताना दिसताच त्याला आवाज दिला. मात्र पसार झाला. रामानंद पोलिसांनी गोकूळविरुद्ध भादंविचे कलम २९५, २९५ (अ), अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास डीवायएसपी संदीप गावीत करीत आहेत.