राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्री मंडळातील एक मंत्री कार्यकर्त्याला शिवीगाळ करीत असल्याची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंत्री देखील अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांची एक कथिक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये ते आपल्या एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत आहेत. त्याचबरोबर ते या कार्यकर्त्याला धमकीसुद्धा देत आहेत. ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच शेअर केली जात आहे पण या ऑडिओ क्लीपची पुष्टी सकाळ माध्यम करत नाही.
“तू लोकांच्या जीवावर उड्या मारतो का? दारू पिऊन शिव्या देतो का? तुझ्या घरी येऊन दाखवतो तुला, रात्री अपरात्री फोन करून शिव्या देतो तू” अशा शब्दांत शिवीगाळ करताना ऐकायला येत आहेत. तर समोरचा कार्यकर्ता त्यांची माफी मागत सारवासारव करताना दिसत आहेत. या ऑडिओ क्लीपमध्ये मालपाणी या व्यक्तीचे नाव घेण्यात आले असून मालपाणी यांच्या फोनवर या कार्यकर्त्याने बापू यांना आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्यामुळे भुमरे यांनी या कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यात आल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कामासंदर्भातील हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे.