प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. काल रात्री लहान माळी वाडा माळी समाज पंच मढी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विजयी स्पर्धकांसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
विचारपीठावर कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, चंदनगुरू व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मराठे, सामाजिक कार्यकर्ते बंडु सोनार, दिलीप महाजन व राजेद्र महाजन उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविकात जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाची माहीती देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने सत्कार करण्यात आला. तद्नंतर प्रमुख पाहुण्यांचा हस्ते स्पर्धेत विजयी झालेल्या शितल भागवत मराठे, कृष्णा दिलीप महाजन, मयुरी रविंद्र महाजन, खुशी ज्ञानेश्वर चौधरी व कीर्ती दिलीप महाजन, यांना छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह विविध महापुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली.
आपल्या मनोगतातून संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी आजचा सामाजिक व्यवस्थेत अडकलेल्या समाजात जागृती निर्माण व्हावी व समाजात वाचन संस्कृती रूजावी तसेच भविष्यात वाचनाची आवड निर्माण झाल्यानंतर त्यातून चांगले संस्कारमय पिढी उभी राहील, असा विश्वास व्यक्त करून, रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वामी समर्थ काॅम्पुटर्सचे संचालक गुलाब महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश माळी, ईश्वर चौधरी, दिलीप महाजन, पंकज पाटील, अशोक झुंजारराव आदींनी परिश्रम घेतले.