जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री मानले जाणारे मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आता एका प्रकरणात जळगाव जिल्ह्या न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड केल्याचे वृत्त समोर आले आहे.
काय आहे प्रकरण ?
राज्यातील युती सरकारमध्ये एकनाथराव खडसे बारा खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात खडसे यांनी 2016 मध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यात सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरु आहे.
पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते. ना. पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने 500 रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, असेही स्पष्ट केले. याबाबतची माहिती खडसे यांचे वकील भूषण देव यांनी माध्यमांना दिली आहे.