जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील भोकरनजीक गांजाची दुचाकीद्वारे होणारी तस्करी रोखत यंत्रणेने तब्बल सात लाखांचा गांजा जप्त केल्याने तस्कर हादरले आहेत. रविवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई आयजींच्या विशेष पथकासह जळगाव तालुका पोलिसांच्या पथकाने केली. या प्रकरणी संशयित मुन्ना सतीलाल पावरा (32, रा.मालापूर, पो.विरवाडे, ता.चोपडा) याला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर सापळा रचणयात आला. रविवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भोकर गावाजवळील धरणगाव रस्त्यावर संशयित मुन्ना पावरा हा दुचाकी (एम.एच.19 टी.2130) वरून 65.540 किलोग्रॅम गांजा वाहून नेत असताना यंत्रणेने त्यास पकडले. सहा लाख 60 हजार रुपये किंमतीचा 65 किलो गांजा व 40 हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी संशयित मुन्ना पावरा विरोधात विशेष पथकातील हवालदार रवींद्र पाडवी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार करीत आहेत.