बीड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या आठवड्यापासून आषाढी वारीला सुरुवात झाली असून अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. वारीमध्ये दुचाकी घुसल्याने चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसल्यानं अपघात झाला. या घटनेत चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. गावकऱ्यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी उपचाराबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच त्यांनी स्वत: जखमी महिला वारकऱ्यांवर उपचार केले. या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. साबळे यांनी दिली आहे. संत मुक्ताबाई आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा हा मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा आहे. तब्बल 600 किमीचा पायी प्रवास असून 25 दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते.