जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यापासून अनेक अल्पवयीन मुलीसह महिलांना पळवून नेल्याची घटना पोलिसात नोंद असतांना देखील आज पुन्हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून दोन अल्पवयीन मुले व एक मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना यावल शहरातून दि. १८ रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून ६ वर्षीय मुलास काही तरी फूस लावून अनोळखी इसमाने पळवून नेले असून या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी इसमाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे हे करीत आहेत.
दुसरी घटना यावल तालुक्यातील एका गावातून ११ वर्षीय मुलास दि.१७ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास काही तरी फूस लावून अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलाच्या पालकांनी यावल पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि.सुनील मोरे हे करीत आहेत.
तिसरी घटना, भुसावळ शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका ७ वर्षीय मुलीस अनोळखी इसमाने काही तरी फूस लावून दि. १८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी बाजार पेठ पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.हरिष भोये हे करीत आहेत.