चाळीसगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात अनेक दिवसापासून बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना टार्गेट करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटना नियमित उघडकीस येत असतांना नुकतेच चाळीसगाव शहरातील बसमधून उतरत असलेल्या महिलेच्या ताब्यातील 26 हजारांचा सोन्याच्या दागिण्यांचा ऐवज असलेली पर्स लांबवताना नागरीकांनी पाठलाग करून सिल्लोडच्या चोरट्या महिलांच्या त्रिकूटाला पकडत चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. ही घटना खरजई नाक्यावर शनिवारी दुपारी दोन वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील २८ वर्षीय महिला आशा समाधान चौधरी या खरजई नाक्यावर बसमधून खाली उतरत असताना तीन भामट्या महिलांनी विवाहितेकडील पर्स बळजबरीने हिसकावून पळ काढला. महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर दोघा-तिघांनी भामट्या महिलांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चाळीसगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती कळवल्यानंतर संशयित महिलांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस चौकशीत संशयितांनी आपले नाव संगीता रमेश म्हसंजोगी (30), ईश्वरी मल्याडू म्हसंजोगी (35) व शिरीषा राघो म्हसंजोगी (25, सर्व रा.पाण्याच्या टाकीजवळ, सिल्लोड. जि.छत्रपती संभाजीनगर) अशी सांगितल्यानंतर त्यांच्याविरोधात आशा चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.