भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाडे शिवारात बिबटयाचा वावर कायम असून त्याने पुन्हा एका वासराचा फडशा पाडला आहे. १४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे भयभीत शेतकरी व ग्रामस्थांनी पिंजरे वाढविण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.
वाडे शिवारातील कैलास मोहन परदेशी यांच्या शेतात रामलाल नथ्थु बोरसे यांची जनावरे बांधलेली होती. यापैकी बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला. याआधीही बिबट्याने बोरसे यांच्या एका वासराचा फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. या पशुपालकास नुकसान भरपाई द्यावी, वाडे परीसरात पिंजरे लावावेत, बिबट्याला जेरबंद करत नागरिकांमध्ये असलेली भीती कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वीही बिबट्याच्या हल्यात वाडे, नावरे, गुढे परिसरातील आठ जनावरे दगावल्या घटना घडल्या आहेत. वाडे येथे गिरणा काठालगत बहाळ शिवारात पिंजरा लावलेला आहे तरीही बिबट्याचा थरार कायम असून मजुरांमध्येही भीतीचे वातावरण आहे.