अमळनेर : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथे डॉ. मोरे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. राऊ मोरे व कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते पवार म्हणाले कि, राज्यातील सरकार शेतकरी, शेत मजूरांना नुसतेच आश्वासन देऊन पाणी दाखवीत आहेत. शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र भरपाई नाही. नोकरभरतीपासून तर विकास कामांच्या निधीतही भ्रष्टाचारच भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
पवार म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करून केवळ तोंडाला पाणी पुसली आहेत. पंचनामे झाले तर मदत नाही, असे चित्र आहे. सर्वसामान्य जनतेवर अन्याय सुरू आहेत. महिला सुरक्षित नाहीत. अत्यंत गंभीर बाब आहे. शासकीय योजना राबविताना निधीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. जनतेची कामे होत नाहीत. यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा घोळ सुरू आहे. प्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच काही महिने काम पाहिले. त्यानंतर १८ जणांचा समावेश केला. तेच काम पाहत आहेत. एका एका जणांकडे पाच-सहा खाते, पाच-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले आहे. या जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असा आरोपही पवार यांनी केला.
ते म्हणाले की, जनतेची कामे होतील कुठून?. योजनांमध्ये भ्रष्टाचार असेल, महिला अत्याचार या सर्व गोष्टी आगामी पावसाळी अधिवेशनात आम्ही विरोधी नेते म्हणून उचलून धरू, त्यासाठी विरोधी पक्षातील सर्व नेते मिळून व्यूहरचना ठरवू,असे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जबाबदारीविषयी छेडले असता विरोधी पक्षनेता हेच सर्वात मोठे व महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. त्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगितले.