अमळनेर : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी अमळनेर येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही घणाघाती टिका केली आहे.
पवार म्हणाले कि, अत्यंत लोकप्रिय म्हणून एका व्यक्तीचा नावलौकिक त्यांच्या संघटनेच्या की त्यांच्या हितचिंतकांनी कुणी दिला ते मला माहिती नाही. ते करुन प्रोजेक्ट केलं. जे सरकार बनलं आहे त्यात मोठा वाटा, आणि मोठी संख्या ही भाजपच्या आमदारांची आहे. पण ही जाहिरात बघून आमच्याच आमच्या ज्ञानात भर पडली की यात भाजपचं योगदान मोठं नाही अन्य घटकांचं आहे आणि हे कळवण्याचं काम या जाहिरातीच्या माध्यमातून आम्हाला कळलंं, अशी सणसणीत टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
८२ हजार कोटींच्या नोटा रिझर्व्ह बँकेत पोहचल्याच नाहीत, त्या परस्पर गहाळ झाल्याची बातमी समोर आली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, यातील ५० टक्के नोटा जमा झाल्याची बातमी माझ्या वाचनात आली आहे. यापेक्षा काही वेगळं असेल तर उद्या पार्लमेंटमध्ये गेल्यावर याची माहिती घेऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. . यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सध्याच्या केंद्रीय पातळीवर जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाची विचारधारा देशाच्या आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. असे सगळे प्रश्न घेऊन एक वेगळ्या प्रकारचे चित्र तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. समान नागरी कायद्याचा अधिकृत प्रस्ताव अद्याप तरी संसदेत आलेला नाही ज्यावेळी येईल त्यावेळी त्याची चर्चा होईल.