अमळनेर : प्रतिनिधी
शहरात अल्पवयीन मुलांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीतील एक आरोपीला न्यायालयीन कोठडीत उपचार सुरु असलेल्या माजी नगरसेवक पुत्र अशपाक उर्फ पक्या सलीम शेख (वय-३३) याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. दंगलीतील संशयीत तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.
किरकोळ कारणावरुन अमळनेर शहरात दंगल झाल्याची घटना गेल्या चार दिवसांपूर्वी घडली होती. दोन दिवस संचारबंदी उठविल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना अटक करण्यात आली होती. यामध्ये अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्यासह त्यांचा मुलगा अशपाक उर्फ पक्या सलीम शेख यालादेखील आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर अशपाक याला पोलिसांनी अटक केली होती. त्याचे वडील माजी नगरसेवक सलीम टोपी हे फरार आहे. संशयित अशपाक हा पोलीस कोठडीत असतांना अशफाक याला उपचारासाठी दि.13 रोजी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचार झाल्यानंतर त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात बुधवारी 14 रोजी हलविण्यात आले होते. दंगलीतील संशयित अशपाक याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी अतिदक्षता विभागातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
उपचार सुरु असतांना संध्याकाळी त्याची तब्येत खालवल्यानंतर उपचारादरम्यान सायंकाळी 7 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. घटनेची अधिक माहिती पोलीस घेत असून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. संशयित आरोपी अशपाक शेख याच्या मृत्यूची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी रुग्णालयात येऊन माहिती जाणून घेतली. यावेळी रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयताचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे. तसेच या प्रकरणाची न्यायीक चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक करीम सालार यांच्यासह मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.