नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील तीन ते चार दिवसापासून बिपरजॉय वादळ मोठ्या प्रमाणात दाखल झाले असतांना आता त्या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून याबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होईल की नाही याची माहिती मंगळवारी देण्यात आली.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढे जाण्यास मदत मिळाली आहे. आता मान्सूनच्या मार्गात चक्रीवादळाचा अडथळा नाही किंवा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता नाही. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
समुद्र किनारी 10 ते 14 मीटर उंच लाटा उसळतील तर 25 सेंटीमीटरहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिपरजॉयमुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून कच्छ, द्वारका आणि जामनगर जिल्ह्याला याचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय. 15 जूनला सांयकाळी जखाऊ बंदराजवळ कच्छच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी चक्रीवादळामुळे 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात असं हवामान विभागाने सांगितलं आहे. चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता असून कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. सोमनाथ आणि द्वारका मंदिराच्या आसपास सर्व आवश्यक तयारी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. गिरच्या जंगलातील पशुपक्ष्यांचीही योग्य काळजी घेण्यात यावी. तसंच आमदार खासदारांनी आपल्या मतदारसंघात शक्य तितकी मदत करावी असंही अमित शहा यांनी सांगितलं आहे.