मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सत्ताधारी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजप-शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात कळीचा मुद्दा ठरल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी आमच्या मतभेद नसल्याचे सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांचा कानाला इजा झाली आहे, त्यांना डॉक्टरांनी प्रवास करण्यास नकार दिल्याचे उत्तर दिले.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोल्हापुरात जाणार होते. मात्र, आजच्या जाहीरातीमुळे भाजप नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यातूनच भाजपामध्ये अस्वस्थता असून याच कारणातून देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौरा रद्द केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
शिवसेनेने आज वेगवेगळ्या वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी जाहीरात देत शिंदेसेनेने आज चांगलीच खळबळ उडवून दिली. झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेवर ही जाहीरात देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असा दावा करण्यात आला आहे.