चोपडा : प्रतिनिधी
शहरातील यावल रोडवरील म. गांधी कॉलेजच्या बाजूला असलेल्या बाजार समितीचे संचालक गोपाल श्रीराम पाटील यांच्या मालकीच्या समर्थ ट्रेडर्स या दुकानातून दिनांक ११ जून रोजी रात्री आठ वाजेपासून ते १२ जूनच्या पहाटे आठ वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून कडीकोयंडा तोडून दुकानात प्रवेश करून सुमारे २ लाख ९२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे..
अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील मुख्य ड्रॉवरमध्ये ठेवलेली ही रोख रक्कम लांबवली आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून अज्ञात आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच यावल रोडवरील हिरा कॉटन या जिनिंगमध्ये झालेल्या आणि आजच्या चोरीची पद्धत सारखीच असून यातही चोरट्यांनी अंगावरचा शर्ट काढून चेहऱ्याला बांधला आहे. त्यामुळे या दोन्ही चोऱ्या एकाच टोळीने केल्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे. शहरात सध्या घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर चोर पकडण्याचे मोठे आव्हान आहे. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.