लक्ष्मण पाटील: पुणे येथील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आज जमीनदोस्त होत आहे, ज्या शाळेने महिला सक्षमीकरणासाठी भक्कम भिंत उभी केली, लहुजी वस्ताद यांची मुक्ता तिथं पोत्यात घालुन शिक्षणाकरिता आणली , आणि याच वाड्यातून गुलामीच्या मुक्तीची विट सशक्त भारत उभारण्यासाठी देश मजबुतीसाठी रचायला सुरुवात केली, ज्याने स्री पुरुष दोघांना सुशिक्षीत केले आणि यावरच आज देश मजबुत उभा राहिला पण ज्या वाड्याने देश मजबुत केला त्याचीच एक एक वीट मात्र आज कोसळत आहे.
सन २००८ पासून हा लढा मा. न्यायालयात आहे, त्यावर किती वेळा शासनाने आपले मत मांडले आणि शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न केला हे विचारले तर लक्षात येईल की सरकार किती उदासीन आहे, कारण सरकार म्हणून आद्य शिक्षण तज्ञ – राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलीच्या शाळेला न्याय मिळावा म्हणून यांनी मा. न्यायालयात कितीदा प्रामाणिकपणे बाजू मांडली हे तपासायलाच हवे, किती वेळा सरकारी पक्षाचा वकील तळमळीने कोर्टात जाऊन भिडेवाडा स्मारक व्हावे यासाठी हजर राहून कामकाज केले ? का “फक्त तारीख पे तारीख” एव्हढेच येणार आहे या पाहिल्या शाळेच्या नशिबी कळायला तयार नाही.
स्री सक्षमीकरण करणारी वास्तू अशी अडगळीत टाकून नेमके या देशातील राज्यकर्त्यांना काय साध्य करायचे हेच कळत नाही, कसला राग आहे यांच्या मनात नेमका ? सुशिक्षित झालेली महिला बरोबरीने वागते , तिचा हक्क आणि अधिकार मागत आहे म्हणून की काय सत्तेवर बसलेला धृतराष्ट्र महिलांना सक्षम करणाऱ्या पहिल्या मुलींच्या शाळेकडेच पाहायला तयार नाही जणू त्यांनी पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणासाठी बांधलेल्या वाड्याला भग्न करून सोडायचं आहे आणि संपून टाकायचं आहे स्री सक्षमीकरणाचे , भारत निर्माणाचे स्वप्न.
भिडे वाडा पहिली मुलींची शाळा भग्न होऊन कोसळत असताना सत्तेत येणारा प्रत्येक धृतराष्ट्र किती दिवस डोळ्याला पट्टी बांधणार आहे.