नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सर्वच सरकार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. असे असतांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात (एमओईएफसीसी) विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. अधिकृत भरती अधिसूचनेत नमूद केल्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना गलेलठ्ठ पगारासह विविध सोयीसुविधा मिळतील. निवडलेल्या उमेदवारांना 3 वर्षांसाठी नियुक्त केले जाईल. हा कालावधी उमेदवाराच्या परफॉर्मन्सनुसार 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. एपीसीसीएफचे प्रधान खासगी सचिव, विभाग अधिकारी आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना 2,08,700 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. या भरती प्रक्रियेद्वारे तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एक म्हणजेच एकूण तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 56 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत. एपीसीसीएफ यांच्या प्रधान खासगी सचिवपदी निवड झालेल्या उमेदवाराला वेतन श्रेणी 67700-208700 नुसार मासिक वेतन मिळेल.
विभाग अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला वेतन श्रेणी 44900-142400 नुसार व कनिष्ठ हिंदी अनुवादक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला वेतन श्रेणी 35400-112400 नुसार मासिक वेतन मिळेल. अर्जप्रक्रिया इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह भरलेला अर्ज एपीसीसीएफ, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, एकात्मिक क्षेत्रीय कार्यालय, 25, सुभाष रोड, डेहराडून- 248001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा. भरतीची अधिसूचना जारी झाल्यापासून 45 दिवसांच्या आत अर्ज हा पोहोचला पाहिजे. अपूर्ण अर्ज किंवा शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेला अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी या भरतीची अधिसूचना नक्की पाहा. पात्रता एपीसीसीएफ प्रधान खासगी सचिव केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सार्वजनिक क्षेत्रातला प्रोजेक्ट किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा विद्यापीठ किंवा वैधानिक किंवा स्वायत्त संस्था इत्यादी अंतर्गत स्टेनोग्राफरचं पद धारण करणारे अधिकारी या पदासाठी पात्र असतील. याशिवाय, स्तर-8 मध्ये सहा वर्षांच्या नियमित सेवेसह वेतन श्रेणी 47600-151100 किंवा पालक संवर्ग किंवा विभागातल्या समकक्ष किंवा लेव्हल-7 मध्ये सात वर्षांच्या नियमित सेवेसह वेतन श्रेणी 44900-142400 किंवा पालक संवर्ग किंवा विभागातले समकक्ष अधिकारी या पदासाठी पात्र असतील.
विभाग अधिकारी या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार केंद्र सरकार किंवा राज्य सरकारं किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सार्वजनिक क्षेत्रातले प्रोजेक्ट किंवा विद्यापीठं किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा वैधानिक किंवा स्वायत्त संस्थांचे अधिकारी असावेत.
पालक संवर्ग किंवा विभागामध्ये नियमितपणे समान पदं धारण केलेले असावेत किंवा पालक संवर्ग किंवा विभागातल्या वेतन स्तर-6मध्ये (35400-112400) पाच वर्षांच्या नियमित सेवेत असावेत. याशिवाय, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्थेतून ग्रॅज्युएशन केलेलं असावं. उमेदवारांना सरकारी कार्यालय किंवा सार्वजनिक क्षेत्रातला प्रोजेक्ट किंवा स्वायत्त संस्था किंवा वैधानिक संस्था यामधले विभाग, प्रशासन आणि आस्थापनामधल्या कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. कनिष्ठ हिंदी अनुवादक उमेदवार केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा विद्यापीठं किंवा सार्वजनिक क्षेत्रातले प्रोजेक्ट किंवा निमसरकारी किंवा वैधानिक किंवा स्वायत्त संस्थांमध्ये पालक संवर्ग किंवा विभागांमध्ये नियमितपणे समान पद धारण करणारे अधिकारी असावेत.
याशिवाय, वेतन बँड-2मध्ये नियमितपणे नियुक्ती झाल्यानंतर प्रदान केलेल्या श्रेणीतली सेवा वेतन श्रेणी 5200-20200 रुपये (2400 रुपये ग्रेड पेसह) पालक संवर्ग किंवा विभागातले समकक्ष; किंवा पे बँड -2 मध्ये नियमितपणे नियुक्ती झाल्यानंतर प्रदान केलेल्या ग्रेडमध्ये दहा वर्षांच्या सेवेसह वेतन श्रेणी 5200-20200 रुपये (2400 रुपये ग्रेड पेसह) पालक संवर्ग किंवा विभागात समकक्ष असावेत. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिसूचनेत सविस्तर माहिती दिली आहे.