जळगाव : प्रतिनिधी
बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवणुक मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून हर्ष धनश्याम अडवाणी (रा. रिंगरोड) या तरुणाची सायबर चोरट्याने ९१ हजारात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात सायबर चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष अडवाणी हा ४ फेब्रुवारी रोजी इस्टाग्राम पाहत असताना त्याला सौरव बिटकॉइन ट्रेडर्स हे अकाउंट दिसले. त्यावर चाट करत असताना बिटकॉइनमध्ये २० हजार रूपये गुंतविले तर दोन तासात तुम्हाला चांगला नफा होईल, असे सांगण्यात आले. हर्ष याने विश्वास ठेवून २० हजार रुपये ऑनलाइन पाठविले. २ तास उलटूनही नफ्याची रक्कम मिळाली नाही म्हणून त्याने त्या अकाउंटवर मेसेज केले. त्यावर त्याला हॅण्डलिंग चार्ज म्हणून २५ हजार ८०० रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम देखील त्याने ऑनलाइन भरली. मात्र, नेट बिझी असल्यामुळे तुमचे पैसे आलेले नाही, असे सांगण्यात आल्यावर हर्ष याने पुन्हा १० हजार रूपये पाठविले. नंतर, अकाउंटची मर्यादा संपली असून दुस-या अकाउंटवर् पैसे गुंतवणूक करू शकतात, असे सांगण्यात आले. त्याने दुस-या अकाउंटवर १२ हजार ६०० गुंतविले. रविवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा हर्ष याला सिक्युरिटी चार्जेस म्हणून २३ हजार रुपये भरण्या बाबतचा एसएमएस प्राप्त झाला. त्यानुसार ती रक्कमही त्याने भरली आणि गुंतविलेले पैशांचे प्रॉफीट मला दाखवा, असे सांगितले. मात्र, त्याला उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी हर्ष याने जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.