जळगाव : प्रतिनिधी
शहरातील खूबचंद साहित्या नगरातील सराईत गुन्हेगार किरण शंकर खर्चे (वय ३०) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण खर्चे याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये १६ गुन्हे तर ५ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. शिवाय जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सुध्दा गुन्हा दाखल असून तो शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवित होता. त्यामुळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्याचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता. नंतर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, सचिन पाटील, सचिन पाटील, योगेश बारी यांनी किरण खर्चे याला ठाण्यातील मीरा भाईंदर येथून ताब्यात घेवून मंगळवारी पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबध्द केले आहे.