मुंबई : वृत्तसंस्था
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तीव्र आंदोलन झाले. आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखाच दूषित होत आहे. राज्यामध्ये सारख्या दंगली होत राहिल्या तर राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जनता घाबरली आणि बिथरली आहे.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “राज्यामध्ये होणाऱ्या दंगलींमुळे जनता घाबरली आहे आणि हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. देशातून भारतीय जनता पक्षाला विरोध होत आहे. हे आता भाजपच्या लक्षात आलं असेल.” दरम्यान, कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच तीव्र आंदोलन सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरच्या शिवाजी चौकात मोर्चा काढत गर्दी केली. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये दगडफेक देखील झाली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आला आहे.