मुंबई : वृत्तसंस्था
सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. शेकडो कोटी रुपये खर्च करून खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, पण शेतकऱ्यांना काही मदत मिळत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.
शिंदे गटाने विरोधी पक्षनेते अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी किती खोके जमवले ते सांगावे असे खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, एकाकडून जरी मी पैसे घेतले असतील तर राजकारण सोडून घरी बसेल, माझ्यावर आरोप करत असाल ते सिद्ध झाले नाही तर खासदार क़पाल तुमने यांनी घरी बसायला हवे. मविआच्या वज्रमूठ सभा गेली काही दिवस झाल्या नाहीत, यावरून प्रश्न विचारला असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. काही जण मुलांना घेऊन सुट्टीसाठी बाहेर गेलेत ते परत आले की तारखा ठरतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला