जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील कंपनीतील कंत्राटी कर्मचार्यांनी गेल्या काही दिवसापासून आदोलन पुकारले आहे. या आंदोलनातील कर्मचारी शेखर गोकुळ पाटील (वय-50) रा.खेडी कढोली ता.एरंडोल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या दबावामुळे व मानसिक त्रासामुळेच कर्मचार्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी कामगार सहकारी व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील शेखर गोकुळ पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बांभोरी येथील हिताची कंपनीत कंत्राटी पध्दतीने नोकरीला होते. गेल्या दि. 23 मे पासून त्यांच्यासह इतर कामगारांनी हिताची कंपनीसमोर प्रलंबित व विविध मागण्यांसाठी कंपनीसमोर बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. रविवारी 4 जून रोजी आंदोलनाचा तेरावा दिवस होता. या आंदोलनात शेखर पाटील हे देखील सहभागी होते. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी असतांना गोकुळ पाटील यांना हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. कंपनीच्या प्रशानाच्या दबावामुळेच शेखर पाटील यांचा मृत्यू झाला आहे असा आरोप सहकारी कामगार आणि नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात आंदोलकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांचा फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला. दरम्यान, आंदोलकांची समजूत काढल्यानंतर मयत शेखर पाटील यांच्या कुटुंंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला.