मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
19 जूनपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यात आहे. दुसरीकडे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे याच बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देखील चर्चा झाली आहे. शिंदेंच्या दोन खासदारांना मिळणार मंत्रिमंडळात स्थान? राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या दोन खासदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावरही अमित शहा यांची या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाली. रात्री उशिरा मुख्यमंत्री मुंबईत परतले, तर देवेंद्र फडणवीस नागपुरच्या दिशेने रवाना झाले.
19 जूनपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता? राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास तो 19 जून आधी होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार आहे. भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे वादग्रस्त आणि प्रभावहीन ठरलेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळामध्ये महिलांना देखील स्थानं दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.