नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 च्याही पार गेला आहे. तर, 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. तसेच, भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
या संदर्भात बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, बालासोर जिल्ह्यात 200 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. ओडिशातील अग्निशमन विभागाचे महासंचालक सुधांशू सारंगी यांनी सांगितले की, आतापर्यंत 207 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले की, ओडिशातील अपघातस्थळी जात आहे. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. भुवनेश्वर आणि कोलकाता येथून बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत. एनडीआरएफ, राज्य सरकारची पथके आणि हवाई दलही तैनात करण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे आणि बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे,” असे त्यांनी ट्विट केले आहे.दरम्यान, एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात वाचलेल्या एका पुरुषाने सांगितले की, “अपघात झाला तेव्हा 10 ते 15 लोक माझ्यावर पडले आणि मी ढिगाऱ्याच्या तळाशी होतो. “माझ्या हाताला आणि मानेच्या मागच्या बाजूला दुखापत झाली. मी ट्रेनच्या बोगीतून बाहेर आलो तेव्हा मला दिसले की कोणीतरी हात गमावला आहे, कोणाचा पाय गमावला आहे, तर कोणाचा चेहरा विद्रूप झाला आहे,” असे वाचलेल्या व्यक्तीने ANI ला सांगितले.
अपघात नेमका कशामुळे झाला?
कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हटले जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओदिशा पर्यंत धावते.