पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील खाजोळे येथे लागलेल्या आगीत पाच गुरे व गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा, शेतीचे साहित्य व शेड जळून खाक झाली. या आगीत तब्बल अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.
खाजोळे येथील वसंत परशुराम पाटील यांची खाजोळे-सार्वे रस्त्याला लागून शेड आहे. या शेडमध्ये दोन दुभत्या गायी व तीन वासरे होती. तसेच गुरांसाठी चारा साठवून ठेवला होता. तसेच शेती उपयोगी साहित्य ठेवले होते. १ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भर दुपारी लागलेल्या आगीत सर्वच जळून खाक झाले तसेच आगीत संपूर्ण शेड व पत्रे तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. अचानक लागलेल्या आगीत तासाभरात होत्याचे नव्हते झाले आगीचे लोळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर असल्याने आग विझवताना ग्रामस्थांना मोठी मेहनत घ्यावी लागली अखेर अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत सर्वच जळून खाक झाले होते. झालेले नुकसान पाहून आगग्रस्त शेडचे मालक वसंत पाटील यांना रडू कोसळले. अनेक वर्षे काबाडकष्ट करून गुरेढोरे त्यांनी घेतली होती. मात्र सर्वच आयुष्याची कमाई ही एकाच तासात हातातून गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.