चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील वटार यागावी भीषण आग लागून तीन घरे जळून भस्मसात झाली. गॅस नळीतून गळती झाली. आणि नंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. गावात हळदीची पंगत असल्याने लहान मुलांसह सर्वजण जेवण करण्यासाठी गेलेले असल्यानेच जीवितहानी टळली. आगीने लाखो रुपयांची आर्थिक हानी पीडित कुटुंबांची झाली आहे. दि. २९ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने क्षणात तीन संसार उघड्यावर आणले आहेत.
चोपडा तालुक्यातील वटार येथे काल सायंकाळी ८ वाजता अचानक आग लागली. आगीत कैलास भिका ठाकरे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. बघता बघता आगीने धनसिंग खंडू कोळी, भिकूबाई सुभाष कोळी व पाडुरंग सुभाष कोळी यांची घरे भस्मसात केली. यात या कुंटुबीयांचे ठिबक नळ्या, शेती साहित्यासह अवजार आदी घरातील धान्यासह सर्व साहित्य जळाले. यात सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरताच सुटकार, वडगावअडावदकरांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर चोपडा अग्निशमनच्या दोन, तर जळगाव येथून आलेल्या एकाने बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत आगीने चौघांचा संसार खाक केला होता. गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली.
घटनास्थळी नायब तहसीलदार सचिन बंबोडे, मंडळ अधिकारी व्ही. डी. पाटील, तलाठी महेंद्र पाटील, अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, व पोलिस कर्मचारी तळ ठोकून होते. शांताराम पाटील, राकेश पाटील, मंगळ इंगळे, सरपंच गोपाल ठाकरे उपस्थित होते.