नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नव्या संसद भवनाचं आज रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असून या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित आहेत. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला आहे. परंतु मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडत आहे.
या कार्यक्रमाची सुरवात पूजा आणि होमहवन याने झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सेंगोल’समोर पूजाविधीनंतर साष्टांग दंडवत घातला त्यानंतर नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीयांकडुन प्रार्थना करण्यात आली आहे. संसदेच्या नवीन इमारतीत सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदि नेते उपस्थित आहेत. यावेळी बौद्ध, जैन, पंजाबी, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू आदि सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडत आहे. देशात सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात. याचा प्रत्यय आजही दिसून येत आहे.