जळगाव : प्रतिनिधी
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा छत्रपती शिवरायांसाठी लिहिलेल्या गीतावर बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि शिवरायांचा अवमान झाला म्हणून संघ-भाजप पिलावळीने बोंब ठोकण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवराय हे भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या ऐतिहासिक व अभूतपूर्व कार्यामूळे ओळखले जाणारे थोर रत्न आहेत. त्यांच्या कार्यातून, विचारांतून आणि धोरणांतून जगभरातील शोषणाविरुद्ध लढणारे तमाम कार्यकर्ते प्रेरणा घेत असतात, घेत राहतील. पण शिवरायांचा अवमान झाला म्हणून बोंब ठोकण्याचा नैतिक अधिकार शिवप्रेमाच्या ढोंगाचा बुरखा पांघरलेल्या संघ-भाजप पिलावळीला अजिबात नाही.
जय भगवान गोयल या संघ-भाजप परिवारातील तथाकथित लेखकाने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या मथळ्यावरुन तर नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी केल्याचे स्पष्ट होतेच पण या पुस्तकाचे मुखपृष्ठ अधिक धक्कादायक आहे. मुखपृष्ठावर थेट शिवरांच्या प्रतिमेसोबत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला गेला आहे. मोदींची तुलना शिवरायांशी करुनही भागले नाही म्हणून त्यानंतर लगेचच ‘आंबेडकर ॲंड मोदी: रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉर्मर्स इंप्लीमेंटेशन’ हे मोदींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना करणारे पुस्तक बाजारात आणले गेले.
महाराष्ट्रातील अहमदनगरच्या श्रीपाद छिंदम नावाच्या पावट्याने पालिका कर्मचाऱ्याशी संवाद करताना शिवरायांच्या नावाने काय गुण उधळले हे सबंध महाराष्ट्राने ऐकले आहे. शिवरायांच्या व जिजाउंच्या चरित्राचे हनन होईल अशाप्रकारच्या शिवचरित्राची मांडणी करणाऱ्या आणि शिवरायांची प्रतिमा ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ या संकुचित बिरुदात अडकवू पाहणाऱ्या बाबा पुरंदरेंचा भाजपने महाराष्ट्राच्या सत्तेत असताना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देवून गौरव केला. ज्या शेतकऱ्यांसाठी शिवरायांनी स्वराज्य उभे केले त्या शेतकऱ्यांचा भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी ‘… तरी रडतात साले’ असे शब्द वापरुन अपमान केला. स्वराज्यासाठी निष्ठेने लढणाऱ्या आणि प्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांची प्रेरणा घेवून देशाच्या सीमेवरील सैन्य देशाच्या रक्षणार्थ खडे असते. त्या सैनिकांबद्दल व त्या सैनिकांच्या बायकांबद्दल अत्यंत खालच्या थरातील भाषा वापरुन भाजपच्या प्रशांत परिचारकाने अपमान केला. भगतसिंग कोश्यारीसारखा नीच राज्यपाल तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याच इतिहासात आजवर झाला नसेल. संघ-भाजपाच्या विषवल्लीवर उगवलेल्या या सडक्या वांग्याने छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला. अलिकडेच भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन आपला ‘भिकार’चोटपणा दाखवून दिला. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सावरकरांना माफीवीर संबोधले म्हणून ‘मी सावरकर गौरव यात्रा’ काढणाऱ्या संघ-भाजप पिलावळीला शिवरायांचा अवमान झालेल्या प्रसंगी शिवरायांची गौरव यात्रा अगर विचार यात्रा काढावी वाटली नाही. कारण, ही पिलावळ ज्या द्वेषाच्या, विषमतेचे समर्थन करणाऱ्या विखारावर पोसली आहे, ती विषवल्ली मूळापासून उपटून टाकण्याची ताकत शिवविचारांत आहे. म्हणून शिवराय हे संघ-भाजप वाल्यांचे आदर्श कधीही होवू शकत नाहीत. शिवप्रेमींची मतं मिळवण्यासाठी ते शिवरायांच्या नावाचा सोयीस्कर वापर करतात, शिवप्रेमाचा बुरखा पांघरतात. त्यांचे खरे आदर्श वेगळेच आहेत. इंग्रजांकडे माफीची भीक मागणारे आणि आपल्या लिखाणातून शिवरायांना व शंभूराजांना दुय्यम लेखणारे सावरकर हे त्यांचे आदर्श आहेत. गांधींची गोळ्या घालून अत्यंत क्रूरपणे हत्या करणारे नथुराम गोडसे हे त्यांचे आदर्श आहेत. गांधी शरिराने गेले पण गांधींचा विचार काही केल्या मरत नाही हे पाहून अस्वस्थ झाल्याने गांधीजींच्या फोटोवर बेछूट गोळीबार करणाऱ्या साध्वी त्यांच्या आदर्श आहेत. ‘माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात’, ‘तू कपाळाला टिकली लावल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही’ अशी मुक्ताफळे उधळणारे भिडे हे त्यांचे आदर्श आहेत. शिव-बसवण्णा-फुले-शाहू-आंबेडकर-भगतसिंग-आण्णाभाऊ, जिजाऊ-अहिल्या-सावित्री-रमाई-फातिमा हे तमाम बहुजनांचे कल्याणकर्ते आणि प्रेरणास्त्रोत असलेले महामानव संघ-भाजप परिवाराचे आदर्श नव्हते, नाहीत आणि होवू शकत नाहीत. म्हणून, या महामानवांचा अवमान झाल्यास त्यावर बोंब ठोकण्याचा नैतिक अधिकार संघ-भाजप पिलावळीला अजिबात नाही.
शिवरायांशी जगातील कुठल्याही व्यक्तीची तुलना होवू शकत नाही. कुठल्याही मार्गाने आणि माध्यमाने अशाप्रकारची तुलना कुणीही केल्यास त्याचे काय करायचे हे लोक ठरवतील. पण शिवप्रेमाचा बुरखा पांघरुन, शिवरायांच्या नावाआडून राजकारण करीत, शिवरायांचा अपमान झाला म्हणत कोल्हेकुई करण्याचा ढोंगी संघ-भाजपाला अजिबात अधिकार नाही. संघ-भाजपाच्या ढोंगाचा बुरखा फाडून, वज्रमूठीचा दणका देवून त्यांच्या सत्तेचे मनोरे उद्ध्वस्त करायला तमाम जनता येत्या काळात सज्ज असेल, याबद्दल तिळमात्र शंका नाही.असे परखड मत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी काल भाजप युवा मोर्चा तर्फे राहुल गांधी यांच्या विरोधातील आंदोलनाला उत्तर देत मत व्यक्त केले