अहमदाबाद : वृत्तसंस्था
पतीच्या निधनानंतर पत्नीला सती प्रथेप्रमाणे जीवन संपविण्याचा हट्ट कुटुंबीयांना केला होता. सती जाण्यासाठी, सासरच्या मंडळींनी सुनेवर इथपर्यंत दबाव टाकला की, अखेर महिलेनं नदीत उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि घटना गुजरातमध्ये घडली आहे.
राजस्थानची मूळ निवासी असलेली संगिता लाखरा, जी आपल्या पतीसमवेत गुजरातमध्ये राहत होती. तिने अहमदाबाद येथील साबरमती नदीमध्ये उडी घेऊन जीवन संपवले. काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींकडून तिला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता.
पोलीस अधीक्षक एम.वी. पटेल हे याप्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसा त्यांनी सांगितले की, महिला आणि तिचा पती दोघेही गुजरातमध्ये एकत्र राहत होते. इथेच तिच्या पतीने घरही खरेदी केलं होतं. जे घर त्याच्या आणि पत्नीच्या नावे करण्यात आलं होतं. मात्र, काही दिवसांतच पतीचे निधन झाल्यामुळे पत्नी एकटी पडली. मात्र, पीडित महिलेला पतीच्या निधनानंतर इंश्युरन्स कंपनीकडून ५४ लाख रुपये मिळाले होते. याची माहिती महिलेच्या सासरच्या घरी कळाली. त्यामुळे, त्यांना सातत्याने महिलेवर दबाव टाकण्यात येऊ लागला.
माझ्या मुलाने खरेदी केलेले घर माझ्या नावावर कर आणि इंश्युरन्सचे पैसे दोघांमध्ये वाटून घे, अशी मागणी महिलेच्या सासूने केली होती. एवढंच नाही तर, सती प्रथेचं पालन करत महिलेनं पतीसोबतच जीव का दिला नाही, असे म्हणत सातत्याने त्रास देण्यात आला. सासरच्या मंडळींसोबत पीडित महिलेनं अनेकदा वाद केला. पण, सर्वकाही असह्य झाल्यानंतर महिलेनं साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी, महिलेच्या कुटुंबातील ५ सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.