जळगाव : प्रतिनिधी
तापमानात वाढीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठाही कमी होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात आणखी ४ गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. पूर्वी १४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता १८ गांवात २० टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे.
अल निनोमुळे जिल्हाभरात उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर उभे राहिले आहे. यंदा पावसाळा एक महिना उशिराने येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
१८ गावांमध्ये २० टँकर
जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, किन्ही, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी दोन टँकर, बोदवड तालुक्यातील एनगाव एक टँकर, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा, खेडीडोक येथे दोन टँकर चाळीसगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव, विसापूर, रोहीणी, अंधारी, हातगाव येथे ६ टँकर, भुसावळ तालुक्यातील रामेश्वर आणि पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे तीन टँकर, अशा एकूण १८ गावांत २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणीसाठ्यात घट
तापमान वाढीमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असून, पाणीसाठ्यात घट होत आहे. वापूर धरण वगळता इतर धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवेल. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील साठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी गिरणा धरणात ३८.०१ टक्के साठा होता. यंदा मात्र त्यात घट झाल्याने तो आता २४.३० टक्के झाला आहे.