जळगाव : प्रतिनिधी
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते घट्ट असते. मात्र, जामनेर तालुक्यातील एका गावात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासला आहे. जिवलग मित्राच्या पत्नीलाच प्रेमात अडकवले आणि ही महिला मुले, पती, सासू-सासरे व आई- वडीलांना सोडून रफूचक्कर झाली. या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे.
बोदवड तालुक्यातील माहेर असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीचे लग्न जामनेर तालुक्यातील एका गावातील तरुणासोबत झाले. संसार गाडा सुरू असताना त्यावर दोन फुले उमलली एक सहा वर्षे तर दसरा चार वर्षांचा आहे. संसार सुखाचा सुरू असताना मित्राने घात केला. जिवलग मित्र असल्याने घरी येणे-जाणे होतेच त्या मित्राने मित्राच्या पत्नीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढले, ती माहेरी आली यानंतर माहेरहून अचानक मुलांना सोडून निघून गेली. आई- वडील धास्तावले. त्यांनी जावयाला माहिती दिली. शोधाशोध झाली. याप्रकरणी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली. पती व लहान चिमुकले ही आई हरविल्याने हताश झाली. काही दिवसानंतर ती गुजरातमध्ये सुरत येथे नात्यातील एका महिलेला दिसली. तिने नातेवाईकांना माहिती दिली. बोदवड पोलिसांना माहिती देण्यात आली. २३ रोजी ती प्रियकरासोबत हजर झाली. पती मुलांसह आला. तू मैत्रीचा घात केल्याचे सांगत पती ओरडला. तिने आपल्या मर्जीने याच्यासोबत राहत असल्याचे सांगितले.