राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी झाली. त्यांच्या या चौकशीनंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, अजित पवारांनी त्यांना फोन केला नाही. अजित पवारांनी जयंत पाटील यांना फोन न केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असतात. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांकडून या चर्चा नेहमी फेटाळण्यात येतात. अशात जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीनंतर अजित पवारांनी त्यांना फोन न केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटलांवर नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ईडी चौकशीनंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “नाही, मला अजितदादांचा फोन आलेला नाही. मला चौकशीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. मात्र, अजित पवार यांचा फोन आला नाही.”
जयंत पाटील यांना फोन का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलवलं नाही. याआधी छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांना देखील बोलवलं होतं. मी त्यांना देखील फोन केले नव्हते. कारण आम्ही भेटून बोलणार होतो. जयंत पाटलांना देखील मी भेटून बोलणार आहे, म्हणून फोन केला नाही. जाणीवपूर्वक या घटनेचे वेगळे अर्थ काढू नका.