जळगाव : प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून मुक्ताईनगर शहरमार्गे मध्य प्रदेशातून गुटक्याची अवैध तस्करी होत आहे. याकडे पोलिसांची भूमिका मात्र बघायची असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून यापूर्वी अनेक कारवाया पोलिसांनी केलेले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गुटख्याची गाडी पकडून गाडीसह लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांच्या स्वाधीन केला. आमदारांना याची माहिती मिळते मात्र पोलिसांना मिळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर शहराकडे येणारी गाडी क्रमांक एम एच 19 सी वाय 92 87 या गाडीत गुटखा असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाली. प्रवर्तन चौकात जाऊन आ. पाटील यनी ही गाडीला पकडली. त्यानंतर पोलिसांना माहिती देवून गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलीस स्थानकाच्या आवारात गाडीतील गुटख्याचे पोते उतरवण्यात आले. मोठ्या प्रमाणात यात गुटखा आढळून आला असून त्याची किंमत गाडीसह अंदाजे वीस लाखापर्यंत असल्याचे समजते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणी अंतिम त्याची किंमत ठरणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली.