नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कर्नाटकात आज सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून, तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय, अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर सुरू आहे. 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसनं 135, भाजपनं 66 आणि जेडीएसनं 19 जागा जिंकल्या आहेत.
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील कोंडी अनेक दिवस सुरूच होती. मात्र, अनेक दिवसांच्या भेटीनंतर आणि हायकमांडनं मन वळवल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलं. यावेळी जी परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियंक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते. काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं. मात्र, बसपा नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.