छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
एकाच कुटुंबातील पाच वर्षीय मुलीसह पती-पत्नीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची ह्र्दयद्रावक घटना वाळूज परिसरातील वळदगावात घडली आहे. हि बातमी वाऱ्यासारखी फिरत असल्याने तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना दि १९ रोजी पहाटे उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील वळदगावात रहिवासी असलेल्या मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) व श्रेया (वय पाच) वर्ष असे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आलेल्यांची नावे आहेत. मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहून शेती करत होते. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला.
सासर-माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचेही मृतदेह घाटीत रवाना केले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही.